पुरंदरमध्ये दहा महिन्यात डबल पैसे करून देण्याच्या लालसेने घातला ६१ लाखांचा गंडा

पुरंदरमध्ये दहा महिन्यात डबल पैसे करून देण्याच्या लालसेने घातला ६१ लाखांचा गंडा

पुणे

आर्थिक गुंतवणूक केलेली रक्कम १० महिन्यांत डबल करून देण्याचे तसेच दर आठवड्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बतावणी करून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सासवड (ता. पुरंदर) येथे घडला.

याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण अशोक शिंदे रा. शिंदेवाडी (ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सचिन दिगंबर लोळे रा.सासवड, (ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे याने फिर्यादी सचिन लोळे यांच्यासह काही नागरिकांना मुंबई येथील सोने वाहतूक कंपनीमध्ये रोख व सोने यांची गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम तसेच प्रोत्साहनपर रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यास बळी पडून लोळेंसह अन्य काहींनी सुरुवातीला काही रक्कम गुंतविण्यासाठी दिली. त्यानंतर शिंदे याने त्यांना दुप्पट पैसे परत दिले ही. 

काही दिवसांनी गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागली आणि त्यांनी शिंदेला एकूण ६१ लाख ५७ हजार ३६८ रुपये दिले. या वेळी शिंदेने गुंतवणूकदारांना बोगस धनादेश दिले. कालांतराने गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले असता शिंदे पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला.

त्यानंतर तो पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस तपासात फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राणी राणे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *