पुरंदर
प्रतिकूलतेवर मात करीत बनलेले पोलीस अधिकारी पुरंदर तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान तसेच लहान वयातच अभ्यासू पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेले अमोल भाऊसाहेब झेंडे यांची पुणे शहर पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे पुरंदर नागरिकांच्या वतीने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अमोल झेंडे हे दिवे ( ता. पुरंदर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून अत्यंत हुशार, शांत, हसतमुख, अभ्यासू पोलीस अधिकारी आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिवे येथे मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण फलटण येथे घेतले.बी.एस.सीचे शिक्षण शिवाजीनगर, येथे घेतले.तर बी.एससी.अॅग्री पुणे येथे आणि एम.एससी अॅग्री कृषी विद्यापीठ राहुरी याठिकाणी घेऊन मित्रांसोबत एमपीएससी परिक्षेचा अभ्यास सुरू केला. व २००९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल गुणानुक्रमाने उत्तीर्ण होवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्याला आवड असलेल्या पोलीस दलाची निवड केली आणि नांदेड जिल्ह्य़ात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांची बदली रोहा(रायगड)येथे झाली.
त्यानंतर नवी मुंबई सहाय्यक पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती झाली.नंतर गृह खात्याने त्यांना बढती देऊन ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती दिली त्यांनी वरील सर्व ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून काम करताना एक अभ्यासू,प्रामाणिक,कर्तव्यदक्ष आणि सचोटीचे अधिकारी म्हणून झेंडे पोलीस दलात परिचित आहेत.
झेंडे पोलिस खात्यात काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून पुरंदर सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातील विकासासाठी तेथील युवकांचे संघटन,स्पर्धा परिक्षेंचा अभ्यास करणारे विद्यार्थी,उद्योग व्यवसाय करणारे तरूण यांना मार्गदर्शन व मदत करतात.त्यामुळे पुरंदर तालुक्यातील अधिकारी बनन्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांचे प्रेरणास्थान आहे.तसेच व्यवसायिक करिअर मार्गदर्शक,अभ्यासू व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख असून पुरंदरच्या नागरिकांसाठी एक आदर्श पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा आदर आहे .
त्यांच्या नियुक्तीमुळे वडील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब झेंडे व आई मंदाकिनी यांना खूप आनंद होऊन आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले. असे म्हणत त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. पुरंदर वासियांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल झेंडे यांनी सर्वांचे आभार मानले व एक सामाजिक जाणीव व कर्तव्य म्हणून पुरंदर तालुक्यातील स्पर्धा परिक्षेंचा अभ्यास करणाऱ्या तरूण तरूणींना वेळोवेळी मार्गदर्शन करून तालुक्यातून जास्तीत जास्त अधिकारी कसे तयार होतील यावर भर देणार असून त्याबरोबरच उद्योग व्यवसाय करणारे तरूणांना देखील मार्गदर्शन व मदत करणार आहे असे त्यांनी सांगितले .