पुणे
पुण्यात कोंढवा येथील खोट्या बलात्कार प्रकरणाची तक्रार चर्चेत असताना शहरात एका 73 वर्षीय आजोबांना ‘म्हातारचळ’ लागल्याचे दिसत आहे. वृद्धाने 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एका खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट असणाऱ्या 27 वर्षीय तरुणीचा 73 वर्षीय म्हाताऱ्याने विनयभंग केला आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये 3 जुलै रोजी ही घटना घडली. 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणी ही क्लिनिकमध्ये एकटी होती. त्याच वेळेला 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया ही वृद्ध व्यक्ती क्लिनिकमध्ये आली.
तरुणी ही त्यावेळेला एकटीच असल्याची संधी या वृद्ध व्यक्तीने हेरली आणि तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले.त्या व्यक्तीने अचानक पुढे येत रिसेप्शनिस्ट तरुणीच्या गालाला हात लावला अन् ‘मला पप्पी दे’ अशी विकृत मागणी केली. या विकृत मागणीने तरुणी घाबरली.
हा विकृत वृद्ध इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुढे त्याच्या खिशाकडे हात दाखवत ‘माझ्याकडे खूप पैसे आहेत तुला हॉटेलला जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो पण माझ्या मनात जे आहे ते कर’ असं देखील म्हटलं.
चोरडिया या विकृत वृद्धाच्या कृतीने घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिक सोडले आणि बाहेर पळाली. हा वृद्ध इसम सुद्धा त्या तरुणीच्या मागे पळाला आणि त्याने ‘उद्या तू क्लिनिकमध्ये आहेस ना?’ असा प्रश्न विचारला.
या वृद्धाच्या प्रश्नाने मानसिक तणावात आलेल्या तरुणीने लगोलग विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले आणि विकृत 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया याच्या विरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलिसांनी सुरेशचंद चोरडिया याचा विरोधात गुन्हा केला. त्यानंतर या विकृत वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.