पुणे
भीमाशंकरचे ज्योर्तिलींग हे खरे नसून आसाममधील ज्योतिर्लिंग खरे आहे, असा दावा आसाम सरकारने केला आहे. त्यामुळे या स्थानावरून वाद निर्माण झाला आहे. भीमा नदी काठी वसलेले ज्योर्तिलिंग हे भीमाशंकर म्हणून अनादी काळापासून प्रसिद्ध आहे. आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका, असे अवाहन भीमाशंकर देवस्थानचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांनी केला आहे.
आसाम राज्यातील डाकिनी टेकडीच्या कुशित वसलेले गुवाहाटीच्या पमोही येथील शिवलींग हे बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे श्री भीमाशंकर आहे. याठिकाणी होणाऱ्या महाशिवरात्री निमीत्त आयोजित कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन एका जाहिरातीद्वारे आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिसवा सरमा यांनी केले आहे.आता यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे.
भाजप सरकारला महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाबरोबरच महत्त्वाची तिर्थ क्षेत्रही हिसकावून घ्यायची आहेत. आसाममधील भाजप सरकारच्या या आगाउपणाचा निषेध करत आहोत. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने या मुद्द्यावर तात्काळ भूमिका स्पष्ट करून असामच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.महाराष्ट्रातील अनेकांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काय सत्य आहे? हे भीमाशंकर देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी सविस्तर माहिती देत सांगितले.
अनादिकाळापासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये ज्योर्तिलिंग आहे. शिवपुराणात, शिवलीलामृतात याचा उल्लेख आहे. शंकरचार्यानीही सह्याद्री पर्वत रांगातील भीमा नदी काठी वसलेले भीमाशंकर यावर काव्य रचले आहे. शिवाजी महाराजांपासून याला मानपान आहेत.
आसाममध्ये भीमाशंकर असल्याचे प्रथमच आज ऐकायला मिळाले. येथील शिवलींग मोठे आहे. तर भीमाशंकरमधील शिवलींग शंकर व पार्वती असे दुभंगलेले आहे. असे भेद असलेले शिव मंदिर इतर कुठेही नाही. भीमाशंकर नावाने मंदिर असले म्हणजे ज्योर्तिलिंग होवू शकत नाही. देशातील इतर ज्योर्तिलिंगामध्येही असेच वाद निर्माण केले गेले. यावर भाविकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन गवांदे गुरूजी यांनी केले आहे.