पुणे
दरमहा 10 टक्के व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन धमकाविणाऱ्या खासगी सावकारावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने कारवाई केली आहे.
संदीप दत्तात्रय भगत (वय – 36 रा. जय भवानीनगर, पौड रोड, कोथरुड) असे या सावकाराचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथक दोनकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावरुन ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी यांनी संदीप भगत याच्याकडून दरमहा 10 टक्के व्याजाने 1 लाख रुपये घेतले होते. पैसे देताना संदीप भगत याने 10 टक्क्याने 10 हजार रुपये कपात करुन 90 हजार रुपये फिर्यादी यांना दिले. फिर्यादी यांनी मुद्दल आणि व्याज मिळून 3 लाख 10 हजार व दंड 4 हजार असे एकूण 3 लाख 14 हजार रुपये रोख व ऑनलाइन परत केले. पैसे परत केले असताना संदीप भगत याने फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या दोन दुचाकी जबरदस्तीने आपल्याकडे ठेवून घेतल्या. तसेच आणखी 70 हजार रुपयांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले.
प्राप्त तक्रारीवरुन खंडणी विरोधी पथक दोनने खाजगी सावकार संदीप भगत याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात आयपीसी 386, 387, 452 व महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे ,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे ,सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.