पुणे
पुण्यात रात्री ३ च्या सुमारास एका महिलेने इमारतीवरून खाली उडी घेतली आहे. चोरीच्या उद्देशाने ही महिला इमारतीमध्ये आली होती. मात्र ती पकडली गेल्याने तिने हे पाऊल उचललं आहे. या घटनेत महिला बचावली असून तिच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चाकण शहरात पहाटेच्या सुमारास महिला एका इमारतीत नागरिकांना आढळुन आली. यावेळी या महिलेने स्वत:ची सुटका व्हावी यासाठी बिल्डिंगवरून उडी मारत पळ काढला. ही घटना कँमेरात कैद झाली आहे. चाकण शहरातील चक्रेश्वर रोडवरील इमारतीत ही घटना घडली आहे.
महिला रात्री ३ वाजता लोकांच्या घरांची बाहेरुन कडी लावून घेत असताना आढळली. यावेळी ही महिला चोरी करण्यासाठी आली असल्याचा अंदाज नागरिकांनी बांधला. ही महिला अनवाणी पायांनी येथे आली होती.नागरिकांनी तिची विचारपूस सुरू केली. तु इथे काय करते, कड्या का लावत होती? कशासाठी आली इथे असे प्रश्न या महिलेला विचारण्यात आले. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मी रोज सकाळी वॉकींगसाठी बाहेर पडते असं या महिलेने सांगितलं. तसेच मी नेहमीच इथे फिरत असते. दरवाजाची कडी बाहेरून कोणी लावली हे मला माहिती नाही. असं देखील या महिलेने म्हटलं आहे.यावेळी नागरिकांच्या तावडीतुन स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. अखेर इमारतीच्या गँलरीतून खाली उडी मारुन ती पळ काढते. मात्र यामध्ये या महिलेचा पाय मोडला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेबाबत चाकण पोलीसांत कुठलाही गुन्हा दाखल नाही मात्र ही महिला पहाटेच्या वेळी या इमारतीत का आणि कशासाठी गेली यावरुन चर्चा सुरु झाली आहे.