सोलापूर
शिक्षणासाठी पुणे शहरात पाठवत नसल्याने आजोबांकडे राहत असलेल्या एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील बोपले गावात ही दुर्देवी घटना घडली. सिद्धार्थ नामदेव लंगर (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.
आत्महत्येपूर्वी सिद्धार्थने आपल्या वडिलांना फोन केला होता. वडिलांशी फोनवर बोलता-बोलता आईला माझ्या मयतीवर रडू देऊ नका, असे म्हणत त्याने फोन कट केला. मृत सिद्धार्थचे वडील नामदेव हे लॉकडाऊनपूर्वी कुटुंबासमवेत पुणे येथे राहत होते. तिथेच मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण करीत होते. त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा पुण्यात शिक्षण घेत होता.
दरम्यान, कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे सिद्धार्थच्या वडिलांच्या हातचे काम गेले. त्यामुळे आता शहरात राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सिद्धार्थच्या वडिलांना पडला. अखेर त्यांनी पुणे शहर सोडून आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला.
सिद्धार्थचे वडील नामदेव लंगर हे कुटुंबासमवेत परत मूळ गावी बोपले येथे राहायला आले. त्यादरम्यान त्यांनी सिद्धार्थ याला शाळेसाठी बोपले गावात आजोबा नवनाथ लंगर यांच्याकडे ठेवले. त्यानंतर ते मोलमजुरीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडीला गेले. दरम्यान, लॉकडाऊन उघडताच शाळा सुरू झाल्यापासून सिद्धार्थ हा आई-वडिलांना फोन करून आपण पुणे येथे शाळेसाठी जाऊ,असे सांगत होता.
त्याच्या आई-वडिलांनी जायचे नाही, इकडेच राहू, असे सांगितल्याने तो नाराज होता.या नाराजीमध्येच सिद्धार्थने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांने वडिलांना फोन देखील केला.
वडिलांशी फोनवर बोलता-बोलता आईला माझ्या मयतीवर रडू देऊ नका, असे म्हणत त्याने फोन कट केला. त्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.