पुणे
एक संसार उमलण्याआधीच कोमेजल्याची दुःखद घटना पुण्यातून समोर आली आहे. दोनाचे तीन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील दाम्पत्यापैकी कोणीच या जगात उरलं नाही. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून पडल्यानंतर डोक्यावरुन चाक गेल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला.
ही घटना डोळ्यादेखत पाहणारा पती या दुस्वप्नातून स्वतःला सावरुन शकला नाही. विषारी औषध पिऊन पतीने स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.

काही दिवसांनी गर्भवती महिला आणि तिचा पती दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. स्पीड ब्रेकर असल्यामुळे गर्भवती रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी समोरुन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्यामुळे ती खाली पडली. दुर्दैव म्हणजे तिच्या डोक्यावरुन ट्रॅक्टरचं चाक गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं.गर्भवतीचा जागेवरच मृत्यू झाला.
आपल्या गरोदर पत्नीचा झालेला भीषण शेवट पतीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. तिचा पती या धक्क्यातून स्वतःला सावरु शकला नव्हता.पत्नीविरहाचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे ही घटना घडली आहे.रमेश नवनाथ कानसकर (वय २९, राहणार धोंडकरवाडी , निमदरी ता.जुन्नर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बसलेल्या संसाराचा आज शेवट झाला. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हळहळला आहे.
विद्या आणि रमेश यांचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती. १४ तारखेला रमेश आपल्या पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणीला गेला.
खरेदी करून घरी जात असताना वारुळवाडी येथे आल्यानंतर ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागला. यामुळे विद्या खाली पडून तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.तेव्हापासून रमेश तणावाखाली होता. त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते.
त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वतःला संपवले. यामुळे आठ महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या संसाराचा अरुंद आणि नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे