पुणे
‘पोस्को’ गुन्ह्यात पोलिस कोठडीची हवा खात असलेला भिगवण येथील जिल्हा परिषद शाळेचा नराधम वर्गशिक्षक दादासाहेब अंकुश खरात (वय 42, रा. कल्याणीनगर, ता.बारामती) याच्याविरुद्ध ‘पोस्को’ कायद्यान्वये दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
वर्गशिक्षकाला पाठीशी घालणार्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, केंद्रप्रमुखाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. उशिरा जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने आता कडक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
दादासाहेब खरात याने अनेक मुलींशी गैरवर्तन केल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. रविवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरही तशा तक्रारी मांडण्यात आल्या.
18 ऑगस्ट रोजी खरात याच्याविरोधात सहावीतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये इयत्ता सातवीतील मुलीशी त्याने गैरवर्तन केले होते. मात्र, त्याने माफीनामा दिल्याने शाळेने प्रकरण मिटविले होते.
संबंधित सातवीतील अल्पवयीन मुलीला चावी देण्याच्या बहाण्याने जवळ ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून खरात याच्याविरोधात आणखी दुसरा ‘पोस्को’ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खरात याला पाठीशी घालण्याचा ठपका ठेवत मुख्याध्यापिका उज्ज्वला मराडे यांच्यावर निलंबनाची, तर केंद्रप्रमुख हनुमंत देवकाते याच्याविरुद्ध सक्तीच्या रजेची कारवाई करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकरी अजिंक्य खरात यांनी सांगितले.