दौंड
दौंड शहरातील खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेला तरुण व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत याचा सात दिवसानंतर मृत्यू झाला आहे . तरुण व्यापाराच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विशाल याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भांड्याचे व्यापारी विशाल दुमावत (वय ३७) यांनी २९ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
आत्महत्या करताना विशालने त्याच्या मोबाईलमध्ये खासगी सावकरांचा नामोल्लेख करत त्यांच्याकडून झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास व्हिडिओच्या माध्यमातून कथन केला होता.विशाल याने दुकानासाठी नऊ खासगी सावकरांकडून मासिक १० ते २० टक्के व्याजदराने तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. मुद्दल व व्याजाची रक्कम दिल्यानंतरही संबंधिक सावरकारांकडून पैशांसाठी धमकी दिली जात होती. त्याचबरबोर दुकानात येऊन दमदाटी आणि शिवीगाळ केली जात होती. तसेच विशाल यास मारहाण करून त्यांनी कोरे धनादेश व मुद्रांकावर सह्या घेतल्या होत्या.
त्या सावरकारांचा त्रास असह्य झाल्यामुळे विशाल याने जीवनयात्रा संपवली.दरम्यान, विशाल याने २९ जानेवारी रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.४ फेब्रुवारी रोजी विशाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दौंड पोलीस ठाण्यात विशाल याच्या पत्नीने तक्रार दिली. तक्रारीनंतर निलिमा गायकवाड, बाबू शेख, नाडी भैय्या, राजू सुर्यवंशी, मुन्नी काझी, टिल्लू काझी, निखिल पळसे, रुपेश जाधव व एक अनोळखी व्यक्ती असे एकूण ९ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. निखिल पळसे ( वय २६), रवी सॅमसन गायकवाड (वय ३४) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक तुकाराम राठोड यांनी दिली.