बारामती
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे .
मधुकर मारुती खोमणे (वय 58) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. खोमणे हा बारामती तालुक्यातील निंबुत सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे . याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार दिली होती .
यासंदर्भात एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे क्षेत्र दुरुस्ती नोंद करायचे होते. जमिनीचे क्षेत्र दुरुस्ती नोंद करण्यासाठी खोमणे याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीने सापळा लावून बुधवारी खोमणे याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप व-हाडे पुढील तपास करीत आहेत.