बारामती
बारामती तालुक्यातील वाकी येथील काही ग्रामस्थांनी ग्रामसेवक – तलाठी गावात येतच नसल्याबद्दल त्यांना गावात दाखवून हजार रूपये मिळवा असा फलक लिहून केलेल्या अनोख्या आवाहनाची चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.
बारामती तालुक्यातील वाकी येथे प्रशासनाकडून नेमणूक करण्यात आलेल्या ग्रामसेविका ह्या कित्येक महीने गावात आल्याच नाहीत असा दावा वाकीचे माजी सरपंच हनुमंत गाडेकर आणि ग्रामस्थांनी केला आहे.
त्याबाबत ग्रामसेविका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. तर वाकी गावाचा अतिरिक्त पदभार असणारे तलाठी भाऊसाहेब इनामदार हे सुद्धा गेले सात महिन्यात गावात आलेच नसल्याचा दावा हनुमंत गाडेकर यांनी केला आहे.
याबाबत तलाठी इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे होळ, सदोबाची वाडी, सस्तेवाडी व अतिरिक्त वाकी, चोपडज, कानडवाडी अशा एकुण सहा गावांचा चार्ज असल्याचे सांगत या सहा गावांना मध्यवर्ती ठीकाण असणाऱ्या अकरा फाटा येथील ऑफिसवर आपण पुर्णवेळ उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
तसेच शासनाकडून सध्या फक्त छापील उतारे देण्याबाबत सूचना असल्याने आणि या सर्व गावात मिळून एकच प्रिंटर मशीन दिली असल्याने ती सगळीकडे घेऊन जाणे शक्य नसल्याने मध्यवर्ती ठिकाणाहून सर्व सहा गावांना सेवा देत असल्याचे सांगितले.