पुणे
पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा मेसेज आला आहे. खंडणी उकळण्यासाठी त्यांना हा मेसेज पाठवण्यात आला आहे. पैसे न दिल्यास दीर दीपक मिसाळ यांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी त्यांना या मेसेज द्वारे देण्यात आली आहे.माधुरी मिसाळ आणि त्यांचे दीर दीपक मिसाळ या दोघांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे.
या मसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इमरान समीर शेख (रा. 79, विकास नगर, घोरपडी गाव) नावाच्या व्यक्तीविरोधात आयपीसी 386, आयटी ॲक्ट कलम 66 (सी) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख याने माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर मेसेज केला आहे.
या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन ते पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली आहे.पैसे न दिल्यास शेख याने मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी दररोज मेसेज करून त्रास देत होता. अखेरीस माधुरी मिसाळ यांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.