पुणे जिल्ह्यातील भयानक घटना!!!!    आई दप्तर घेऊन येणार आहे म्हणुन चिमुकली वाट पाहत बसली;पण आईचा मृतदेहच आला घरी

पुणे जिल्ह्यातील भयानक घटना!!!! आई दप्तर घेऊन येणार आहे म्हणुन चिमुकली वाट पाहत बसली;पण आईचा मृतदेहच आला घरी

पुणे

गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यु झाला,तर तिचे दुचाकीस्वार सासरे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१, रा. झाला कॉम्प्लेक्स समोर, शनेश्वर बंगला, गंगाधाम चौक) हे दुचाकी चालवत होते. त्यांच्या मागे दीपाली युवराज सोनी (वय २९) बसल्या होत्या. त्या मार्केटयार्डमधील एका शाळेतून मुलीचे शालेय साहित्य घेऊन घरी निघाले होते. गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच ते बिबवेवाडीच्या दिशेने वळताना मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

जगदीश गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकचालकाचे नाव शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, पुणे) असे आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर गंगाधाम चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली.

‘आई माझं दप्तर घेऊन येणार आहे ना?’
बिबवेवाडी : ”माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा…”, सात वर्षांची मुलगी गार्गी आतुरतेनं आईची वाट पाहत होती. पण तिला पुसटशीही कल्पना नव्हती, की आई आता कधीच परत येणार नाही. गार्गीच्या या हळव्या प्रश्नाने उपस्थितांचे मन हेलावले.

गंगाधाम चौकातील अपघातात दीपाली सोनी यांचा मृत्यू झाला. त्यांना मुलगा विराज आणि सात वर्षांची मुलगी गार्गी आहे. बुधवारी सकाळी घरातून निघताना दीपाली गार्गीला म्हणाल्या होत्या की, ”तुझं दप्तर घेऊन येते गं!” पण हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. सोनी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. त्यांचा पानविक्रीचा व्यवसाय आहे. दीपाली यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. एक आई आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी बाहेर पडली आणि काळाने तिला गाठले… मात्र आई दप्तर घेऊन येणार म्हणून गार्गी तिची वाट पाहत उभी होती. या प्रसंगाने सर्वजण भावुक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *