पुणे
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातीली दौंड तालुक्यामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दौंडमध्ये रात्री एका तरुणाने आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून एकाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली.रात्रीच्या वेळी ही घटना घडली असून आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यातील दौंड शहरातील इंदिरानगर परिसरात गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२५) उशीरा रात्री धक्कादायक खूनाची घटना घडली. कौटुंबिक कारणांवरून झालेल्या वादातून एकाने कोयत्याने वार करून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11:45 वाजता, इंदिरानगरमधील जब्बार शेख यांच्या घरासमोर प्रवीण दत्तात्रय पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
आरोपी विशाल उर्फ नण्या किसन थोरात (रा. इंदिरानगर, दौंड) याला राग होता की, त्याच्या आईचे प्रवीण पवार यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत. या कारणावरून त्याने संतापाच्या भरात कोयत्याने पवार यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि हातावर वार केले. या हल्ल्यात प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची फिर्याद नितीन अशोक गुप्ते (वय 41, व्यवसाय – भाजी विक्री) यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिली. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 103 (नवीन क्रिमिनल कोडनुसार खूनाचा गुन्हा) नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.