मुळशी
ग्रामसभेत मागील ग्रामसभेचे , प्रोसिडिंग मागितल्याने सरपंचाने साथीदारांच्या मदतीने भरग्रामसभेत माजी सरपंचावर कोयत्याने वार केला तसेच सुर्याने डोक्यात वार केले.
जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले जात असताना गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा प्रकार मुळशी तालुक्यातील वेगरे गावात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.
याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या पौड पोलिसांनी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सरपंच मिनाथ मारुती कानगुडे (वय ३७) आणि अभिषेक दत्तात्रय कानगुडे (वय २१, दोघे रा. वेगरे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी भाऊ पांडुरंग मरगळे (वय ३७, रा. वेगरे, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १५६/२२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगरे गावाची ग्रामसभा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती.सभा सुरु झाल्यानंतर माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी मागील ग्रामसभेचे प्रोसिडिंग व घरकुल यादी याबाबत विचारणा केली.तेव्हा सरपंच मिनाथ कानगुडे याने “मी सभेचा अध्यक्ष आहे.तुम्ही माझ्या परवानगीशिवाय बोलायचे नाही” असे बोलून ग्रामसभेतून बाहेर जाऊन हातात लाकडी दांडके घेऊन आले.
राजेंद्र गुंड याच्या अंगावर धावल्याने भाऊ मरगळे हे मध्ये गेले.तेव्हा त्याने मरगळे यांच्या हातावर व खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली.त्यांच्याबरोबर असलेले अभिषेक व मुन्ना पोळेकर यांना मोठ्याने आवाज देऊन भाऊ मरगळे याला जिवंत मारुन टाक व येथेच पुरुन टाका, असे सांगितले.
मुन्ना याने सुरा फिर्यादीच्या डोक्यात, मानेवर, खांद्यावर मारुन गंभीर जखमी केले.त्यावेळी मिनाथ याने अभिषेक याच्या हातातील कोयता घेऊन तो फिर्यादीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारला.त्यानंतर इतरांनी त्यांना गाडीतून रुग्णालयात नेऊ लागले.
तेव्हा अभिषेक याने गाडी अडवून कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्या. तरीही त्यांनी गाडी तशीच पुढे नेली.त्यांच्या गाडीचा आरोपींच्या साथीदारांनी पाठलाग करुन इरिगेश कॉलनीसमोर गाडी अडविली.
दगडाने गाडीच्या समोरची काच फोडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सरपंचासह दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.