पुणे
विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांसह नर्सवर गुन्हा दाखला केला आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.अतुल तुपसौंदर्य असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर डॉ खालीद सय्यद, डॉ आयेशा सय्यद आणि परिचारिका सुनिता गडपल्लु अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी कविता अतुल तुपसौंदर्य यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अतुल यांना सप्टेंबर २०२१ मध्ये अंगात कणकण वाटत होती यासाठी ते २१ तारखेला खडकीतील जुना बाजार येथील डॉ. सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉ खालीद आणि डॉ आयेशा यांनी अतुल यांच्या कमरेवर इंजेक्शन दिले.या चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे अतुल यांना नाजूक जागी इन्फेक्शन झाले. यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, ३ दिवसात अतुल यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अतुल यांचा मृत्यु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली होती.तक्रार दाखल झाल्यानंतर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तब्बल सव्वा वर्षानंतर याबाबतचा अहवाल आता समोर आला असून चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच अतुल यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.दरम्यान, सदरील अहवालानुसार, पोलिसांनी डॉ खालीद, डॉ आयेशा आणि परिचारिका सुनिता गडपल्लु यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस येताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.