पुणे
तळेगाव दाभाडे येथील महिलेच्या खुनाची गुन्हे शाखेने उकल केली असून चार संशयित आरोपींना अटक केली आहे. संबंधित महिलेनं लग्नाचा तगादा लावल्याने तिचा सुपारी देऊन काटा काढण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.
बजरंग मुरलीधर तापडे, पांडुरंग बन्सी हारके, सचिन प्रभाकर थिगळे, सदानंद रामदास तुपकर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.मावळ मधील तळेगाव येथे नऊ ऑगस्टला महिलेचा खून झाला होता. पोलिसांनी पंचनामा केला असता खून नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पोलिसांनी तळेगाव दाभाडे व आसपासच्या परिसरात तपास सुरु केला.या तपासात बजरंग तापडे हा संबंधित महिलेला ओळखत असल्याचे समोर आले. त्याची अधिकचौकशी केली असताना त्याने उडवा उडवीची उत्तर दिली.
त्यानंतर त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर पोलिसांनी तापडे याला अटक केली.महिलेचे आणि तापडे याचे संबध होते. तिने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तापडे हा विवाहित असल्याने तसेच त्याला तीन मुले असल्याने त्याने लग्नाला नकार दिला होता. परंतु महिलेचा तगादा सुरुच राहिला.
त्यामुळे तापडे तिचा काटा काढला असं पोलिसांनी सांगितलं.वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे म्हणाले संबंधित महिला स्कूटीवरून घरी येत असताना संशयित आरोपी तिथे आले व त्यांनी स्कूटी अडवून महिलेस खाली उतरवून तिचे केस पकडून धारदार चाकूने गळा चिरून तिला ठार मारलं.
त्यानंतर तेथून सर्वांनी पळ काढला. यातील तीन संशियतांना गुन्हे शाखेने तर सदानंद तुपकर याला तळेगाव पोलिसांनी अटक केली.