इंदापुर
इंदापूर येथे एका वन कर्मचाऱ्याच्या अंगावर झाड पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेचे वटलेले झाड तोडत असताना ते झाड या कर्मचाऱ्याच्या अंगावर पडून ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानदेव बाबुराव ससाणे (वय 55 वर्षे), राहणार कळस तालुका इंदापूर असे मयत झालेल्या या वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. ससाणे हे वनविभागाच्या कामकाजासाठी इंदापूर शहरात येत असताना इंदापूर-अकलूज रोडवर खुळे चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कडेचे झाड तोडण्यात येत होते. ते झाड ससाणे यांच्या अंगावर पडून ते जागीच मृत्यूमुखी पडले.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेचे झाड तोडताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नव्हती. तो रस्ता वाहतुकीसाठी बंद केला नव्हता. मशीनच्या साह्याने वटलेले झाड तोडण्याचे काम खाजगी कर्मचारी करत होते.
त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगत ससाणे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेत नेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता .