पुणे
पुण्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कात्रज येथे राहणारा २५ वर्षीय सोमनाथ बळीराम शिंदे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.२५ वर्षीय सोमनाथ बळीराम शिंदे हा पुण्यातील कात्रज येथे राहत होता. सोमनाथ हा शनिवारी त्याच्या नऊ मित्रांसह टेलबैल गडावर ट्रेकसाठी गेले होता. रविवारी सकाळी सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप, दोर बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या पाठीमागून दोरीच्या साहाय्याने उर्वरीत तरुण गडावर चढाई करणार होते.
सकाळी साडे नऊ वाजता ट्रेकिंगचा दोर तुटल्याने सोमनाथ थेट १०० फूट खाली कोसळला. त्यानंतर तेथून पुन्हा १०० फूट आणखी खाली कोसळला. त्यामुळे २०० फूट खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि त्याच्या मित्रांचा ग्रुप तैलबैल येथे ट्रेकिंगसाठी आला होता. रात्री गावात मुक्काम केल्यानंतर पहाटे त्यांनी ट्रेकला सुरुवात केली. मात्र, सोमनाथ योग्य उपकरणांचा अभावामुळे खाली पडला. २०० फूट खाली पडल्यामुळे सोमनाथला गंभीर मार लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची ही माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेस्कू करत सोमनाथ शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, सोमनाथचा जागीच मृत्यू झालेल्या त्याच्या मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली. सोमनाथच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर सोमनाथच्या मृत्यूने कात्रज परिसरात शोककळा पसरली आहे.