पुणे
पत्नी माहेरी गेल्याच्या कारणावरून जावयाने चक्क सासुरवाडीतील घरालाच आग लावल्याचा धक्कादायक समोर आला आहे. या घटनेत घरातील काही साहित्य जळाल्याने नुकसान झाले. ही घटना कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गुरुवारी (ता.५) मध्यरात्री घडली.या प्रकरणी सासूने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलचा पत्नीशी वाद झाला होता. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली.त्यामुळे साहिल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीत गेला.
त्याने पत्नीला ‘मी तुझ्या घराजवळ आलो आहे. तू पाच मिनिटांत माझ्यासोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन’, अशी धमकी दिली. त्यानंतर साहिलने सासूच्या घराला आग लावली. त्यात घरातील साहित्य जळाल्याने नुकसान झाले.
या आगीत घरातील गादी आणि सोफा जळाल्याने नुकसान झाले आहे. कोथरूड पोलिसांनी पसार झालेल्या पतीला अटक केली आहे.- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन
याबाबत माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम, पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.