पुणे
मुलीच्या प्रकरणातून एकावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार बारामती शहरातील देशमुख चौकात घडला. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौरव राकेश वर्मा व गणेश दाते उर्फ गरगडे (रा. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक उर्फ आब्या प्रकाश वणवे (रा. पतंगशहानगर, बारामती) असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत चैतन्य संदीप चांदगुडे (रा. श्रीरामनगर, कसबा, बारामती) या युवकाने फिर्याद दिली.१५ एप्रिल रोजी ही घटना घडली. वणवे आणि चांदगुडे हे शालेय जीवनापासूनच मित्र आहेत. घटनेदिवशी वणवे याने चांदगुडे याला फोन केला. गणेश नावाच्या मुलाचा मला फोन आला होता, त्याने तु अमुक एका मुलीच्या नादाला का लागला आहे, तिचे आणि माझे अफेअर आहे, तु तिच्या नादी लागू नको, असे सांगितल्याचे वणवे याने चांदगुडे याला सांगितले.
काही वेळानंतर गणेश याने वणवे याला फोन करून तु देशमुख चौकात ये, आपण बोलून मिटवू असे सांगितले. त्यानुसार चांदगुडे हा आपला मित्र टायगर महेंद्र गायकवाड याच्यासह वणवे याला सोबत घेवून देशमुख चौकात गेले.येथे गणेश हा बुलेटवर बसला होता. तर वर्मा हा बाजूला थांबला होता.
चांदगुडे याने खाली उतरत गणेश याला काय मॅटर आहे, अशी विचारणा केली, त्यावर वणवे हा सारखा आमच्या गल्लीत का येतो, अशी विचारणा त्याने केली. तो डिस्ट्रीब्युटर असल्याने येत असेल असे चांदगुडे सांगत असतानाच वर्मा याने शर्टामागे लपवलेला चाकू काढत वणवे याच्या कमरेवर मारला. त्या ठिकाणाहून रक्त येवू लागल्याने तो पळू लागला. त्यावेळी वर्मा आणि दाते या दोघांनी त्याला गाठले. फिर्यादी आणि टायगर हे दोघे त्यांना आवरायला गेले असता त्यांनी तेथे पडलेला दगड उचलून मारला.
वणवे याला रस्त्यापलीकडे गाठत त्याच्या पोटात, पायात, डाव्या हातावर वर्मा याने चाकूने वार केले. दाते याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला आता जीवंत ठेवतच नाही, असे ते म्हणत होते. वणवे याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवू लागल्यावर हे दोघेही बुलेटवर बसून कदम चौकाच्या दिशेने निघून गेले.
त्यानंतर फिर्यादी आणि टायगर यांनी दुचाकीवरून त्याला येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथून गिरीराज व तेथून पुढे पुण्याला उपचाराला हलविण्यात आले आहे.