पुणे
नागरिकांची फसवणुक करण्यासाठी नवनवीन प्रकार, युक्त्या आखल्या जातात, त्यातच मार्केटमध्ये आता नवीन फ्रॉड समोर आला आहे. पुण्यातील एका महिला गृहउद्योग समूहाने लोणी काळभोर, उरुळी कांचन, भेकराईनगर व परिसरातील हजारो महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तर, या फसवणुकीची व्याप्ती अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
या उद्योग समूहाच्या सासवड, भेकराईनगर, पिंपरी चिंचवड, सोलापूर व पंढरपूर या ठिकाणी चार मुख्य कार्यालये आहेत. तर उरुळी कांचन, हडपसरसह परिसरात वस्तू वाटप करण्याची छोटी कार्यालये आहेत. या उद्योग समूहाने हजारो महिलांना काम देण्याचे आमिष दाखवून गंडा घातला आहे.
रोजगार मिळणार व त्यातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक गाडा चालणार असल्यामुळे महिला या उद्योग समूहाकडे आकर्षित झाल्या असून त्यांनी या समूहाचे सभासदत्व स्वीकारले आहेकाही तास काम केल्यानंतर दररोज दोनशे रुपये मिळणार या आशेने काही महिलांनी एक, तर काही महिलांनी दोनहून अधिक सभासत्व स्वीकारले आहे.
यासाठी उद्योग समूहाने प्रत्येक महिलेकडून 2050 रुपये घेतले आहे. यामध्ये 500 रुपये कंपनीची फी, 50 रुपये फॉर्म फी आणि डिपॉझिट म्हणून 1500 रुपये घेण्यात आले आहेत. डिपॉझिटचे 1500 रुपये काम सोडल्यानंतर आठ दिवसानंतर दिले जाणार आहेत. तसेच या उद्योगसमूहाला दर शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याचे उद्योग समूहाच्या सुपरवायझरने सांगितले होते.
लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील महिला सदर उद्योग समूहाच्या सभासद झाल्यानंतर त्यांनी उरुळी कांचन येथील छोट्या वाटप केंद्रातून 1 हजार पेन्सिल पॅक करण्यासाठी घेतल्या. प्रत्येक बॉक्समध्ये 10 पेन्सिल याप्रमाणे 100 बॉक्स तयार केले. त्यानंतर बॉक्सवर लेबल लावून महिलांनी पुन्हा हे बॉक्स ऑफिसमध्ये जमा केले. प्रतिमहिना चार ते साडेचार हजार रुपये मिळणार असल्यामुळे महिलाही खुश झाल्या होत्या.
मात्र, उद्योग समूहाने बनवलेल्या मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे फसल्या.सुरुवातीचे चार-पाच दिवस महिलांना वेळेवर वस्तू मिळाल्या. त्यानंतर महिलांना वस्तू मिळाल्या नाहीत. त्यावेळी सुपरवायझरकडून वेळोवेळी वेगळी कारणे येऊ लागली. आज माल आला नाही, कार्यालयाला सुट्टी आहे, उद्या या असे सांगण्यात येत होते. मात्र, महिलांना माल मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे परत मागण्याचा तगादा लावला.
तेव्हा या उद्योग समूहाने मागील काही दिवसांपासून ऑफिस उघडले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिलांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे.महिला गृहउद्योग समूह असा स्कॅम करीत असेल, तर हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. तसेच या घटनेत महिलांच्या फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
या प्रकरणी कोणत्याही महिलेने पुढे येऊन तक्रार न दिल्याने अद्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महिला गृहउद्योग समूहाच्या अध्यक्षांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा फोन बंद असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, त्यांचा फोन गेल्या १५ दिवसांपासून बंद असून ते गायब झाल्याची माहिती मिळत आहे.