पुणे
सासरी नांदायला आलेल्या महिलेसह तिच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी तिच्या पतीसह पाच जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे घडली. याबाबत पोलिस ठाण्यात सना परवेज शिकिलगार (रा. आदर्शनगर, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार पती परवेज इसाक शिकिलगार, तय्यब इसाक शिकिलगार, इम्तियाज इसाक शिकिलगार, असिफा इसाक शिकिलगार व इसाक अब्बास शिकिलगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादीही तिच्या आईसोबत सासरी सुपे येथे आली होती.
सासरी नांदण्यासाठी ती आली असताना असिफा व इसाक यांनी तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. रात्री ११ च्या सुमारास पती परवेज याने “तुझी हिंमत कशी झाली येथे यायची”, असे म्हणत तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत जमिनीवर आपटून फोडून नुकसान केले. त्यानंतर तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर तय्यब व इम्तियाज यांनी लाकडी दांडक्याने तिच्या दोन्ही पायांवर मारहाण केली.दरम्यान, फिर्यादीची आई तिला सोडवण्यासाठी आली असताना तिला ढकलून देण्यात आले. असिफा व इसाक यांनी फिर्यादीच्या आईला देखील हाताने मारहाण करत शिवीगाळ केली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.