पुणे
खेड तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजय दादाभाऊ गावडे (रा. वडाचीवाडी, केंदुर, ता. शिरूर) या संशयिताला अटक केली असून, संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी खेड तालुक्यातील रहिवासी असून आरोपी हा तिच्या बहिणीचा पती आहे. नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला धमकावून आपल्या ताब्यात घेतले. 28 ऑगस्ट रोजी रात्री आरोपी खेड शहरात पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी त्याने मुलीला फोन करून, “मला कांद्याची गाडी पुण्यात खाली करायची आहे, तू माझ्यासोबत ये, अन्यथा मी माझ्या जिवाला काहीतरी करेन,” अशी धमकी दिली.
अचानक मिळालेल्या या धमकीने घाबरलेल्या मुलीने त्याच्यासोबत जाण्यास नाईलाजाने मान्यता दिली.यानंतर आरोपीने तिला गाडीत बसवून पुण्याकडे नेले. पुण्यातून त्याने तिला शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील जाधव वस्ती येथे आणले. तिथे एका भाड्याच्या खोलीत दोन दिवस तिच्या इच्छेविरुद्ध तिला थांबवून वारंवार अत्याचार केला. या काळात पीडित मुलगी आरोपीला सतत विनंती करत होती की तिला घरी सोडावे.
मात्र, आरोपीने तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत, “तू माझ्यासोबतच राहायचे, नाहीतर मी तुझ्या बहिणीला इजा करेन,” अशी धमकी देऊन तिला घाबरवून ठेवले.दरम्यान, पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई-वडील आणि नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर 31 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी मुलीचा मागोवा घेत शिक्रापूरच्या जाधव वस्ती येथील खोली गाठली. त्यांना पाहताच आरोपीने घाबरून मुलीला खोलीत सोडून दिले आणि घटनास्थळावरून पसार झाला.
यानंतर पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना आणि चुलत्याला संपूर्ण प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी त्वरित खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अजय दादाभाऊ गावडे याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कुटुंबीयांनी पीडित मुलीला मानसिक धीर देण्यास सुरुवात केली आहे.