पुणे
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या भोसरी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.संतोषकुमार बालासाहेब गित्ते असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत 79 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची कंपनी असून कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी त्यांनी भोसरी महावितरण कार्यालय उप विभाग – 1 येथे अर्ज केला होता. विद्युत कनेक्शन बंद करण्यासाठी गित्ते यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पुणे एसीबीच्या पथकाने 12, 13 आणि 17 ऑगस्ट रोजी पडताळणी केली. पडताळणीमध्ये तक्रारदार यांच्या कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी संतोषकुमार गित्ते याने 50 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे एसीबीने बुधवारी दुपारी भोसरी पोलीस ठाण्यात गित्ते विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.