मुंबई
राज्य विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन नुकतेच संपले खरे पण विरोधकांकडून सरकारचे वाभाडे काढणे सुरुच आहे. ‘पन्नास खोके एकदम ओके’ विरोधकांनी अशा जोरदार घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर अधिवेशनात निशाणा साधला होता.
यावरून राजकीय वातावरण तापलं आणि शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली. अशातच आता पोळा सणाच्या निमित्तानेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून शिंदे गटाला पुन्हा एकदा डीवचलं आहे.
पोळा सणानिमित्त बैलावर ५० खोके ओके लिहून शिंदे गटातील आमदारांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. आता काय या बैलाला शिंगावर घेणार का? मी तर म्हणतो आणि घेऊनच बघा, असं ट्विट करत मिटकरींनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
बीड येथील गाव खेड्यातही पोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुकी काढण्यात आल्या. या मिरवणूकीत नागरिकांचं लक्ष वेधलं ते बैलांच्या पाठीवर लिहिलेल्या एका खळबळजनक विधानानं. बैलांच्या अंगावर 50खोके एकदम ओके, असं लिहून मिरवणूक काढण्यात आली.
या माध्यमातून विरोधकांनी शिंदे गटातील मंत्र्यांना लक्ष करून बीडमध्ये अनोख्या स्वरूपात हा बैलपोळा साजरा केला.विशेषतः बीडच्या हिंगणी हवेली गावात हा अनोखा बैलपोळा साजरा करण्यात आला असून याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनात शिंदे गटातील आमदारांची विरोधकांनी कोंडी केली. पन्नास खोके एकदम ओके, विरोधकांनी अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारवर घेरले होते. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळं यंदाच्या पावसाळी अधिवेशन वादळी झालं.