रत्नागिरी
देशभरात चलनी नोटांवर कुणाचा फोटो लावायचा यावरून राजकीय नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली आहे. अनेकांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली आहे. काहींनी देवदेवतांची नावे सूचवली आहेत. तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली आहे. राज्यातूनही अनेक पक्षांनी नोटांवर कुणाचा फोटो असावा याची नावे सूचवलेली आहे.
राजकीय नेत्यांची ही स्पर्धा सुरू असतानाच सोशल मीडियातून काही लोकांमध्ये खोडसाळपणा सुरू आहे. कुणी तरी नाण्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा फोटो छापावा असं म्हटलं आहे. तसेच राणेंचा फोटो असलेला चलनी नाण्याचा फोटोही व्हायरल केला आहे.
या खोडसाळपणावर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे.सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीने एक पोस्ट व्हायरल केली आहे. या फोटोत 25 पैशाच्या नाण्यावर नारायण राणे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यावर, सगळं जाऊ द्या हे फायनल करा. भक्तांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. काहींनी तर हे फायनल करा, भक्तपण खूश, असं लिहिलं आहे. एकाने तर हे फायनल करा. नाही तर रक्ताचे पाट वाहवू, असं म्हटलं आहे.
पण हा फोटो नेमका कुणी तयार केला आणि व्हायरल केला याची काहीही माहिती मिळालेली नाही.हा फोटो व्हायर होताच त्यावर भाजपच्या युवा मोर्चाने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपच्या युवा मोर्चाने थेट कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अशोक स्तंभाच्या जागी राणेंचा फोटो लावून कुणी तरी अशोक स्तंभाचा अवमान केला आहे. हे चुकीचं आहे. तसेच हा प्रकार असंवैधानिक असून खोडसाळपणाचा आहे.
त्यामुळे अज्ञात व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.भाजप युवा मोर्चाने काही लोकांची नावेही पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी ही नावे घेतली असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेली नाही.
तसेच कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही.दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी केली होती.
याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रंही लिहिलं आहे. केजरीवाल यांच्या या मागणीनंतर नोटांवर कुणाचा फोटो असावा याबाबत विविध राजकीय पक्षांकडून वेगवेगळी नावं सूचवली जात आहेत.