नीरा
नीरा (ता.पुरंदर) येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून करून नीरा भागात आपले वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या टोळीवर आता संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या नुसार कारवाई करण्यात येणार आहे.त्यामूळे आता तालुक्यात नव्याने उदयाला येऊ पाहणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनच्यावतीने गणेश रसकरचा खून करणाऱ्या ठोळी विरोधात संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यामार्फत कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर करण्यात आलेला होता. नीरा भागात कोणती ही टोळी उदयास येऊ नये म्हणून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव गौरव लकडे याचे साथीदार निखिल रवींद्र डावरे याच्यासह गणेश रासकर खुनाचा मास्टरमाईंड गणेश लक्ष्मण जाधव व बेकायदा शस्त्र विक्री करणारा संकेत सुरेश कदम व अक्षय पाटील यांच्या विरोधात हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार या प्रकरणात कलम लावण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक यानी मंजुरी दिली आहे . मंजुरी नंतर या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सामील असलेले सर्व आरोपी एकेकाळी गणेश रासकर याचे उजवे-डावे साथीदार होते. परंतु मुळशी पॅटर्न चित्रपटाप्रमाणे मुख्य गुन्हेगाराचा खातमा जो करील त्याचा नंबर टोळीच्या प्रमुखपदी लागतो. यातूनच ही घटना घडली होती.गणेश रासकरच्या खुनाला संघटित गुन्हेगारी कायद्याचे कलमाचे लागू झाल्याने गुन्हेगारांचे पाळेमुळे नेस्तनाबूत करण्यात पोलिसांना पाठबळ मिळणार आहे. या टोळीशी संपर्कातील सर्व व्यक्तींची चौकशी होणार आहे. यापुढे कोणत्याही पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगाराला सोबत कोणत्याही व्यक्तीने पहिला जरी गुन्हा केला तरी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे. असे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.
या कारवाईसाठी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी खुनाचा तपास करताना प्रस्ताव पाठवला होता. त्यांना पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार, महादेव कुतवळ, पोलीस हवालदार विठ्ठल कदम यांनी प्रस्ताव करताना सहाय्य केले होते. जेजुरी पोलीस ठाण्यात तर्फे याहीपुढे अशा कारवाया सतत सुरू राहतील, गुन्ह्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जरी नसाल तरी गंभीर गुन्ह्याचा कट केला आणि गुन्हेगारांसोबत सामील झाला तर मोकांतर्गत कारवाई होणारच. हाच संदेश आम्ही देत आहोत असे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यानी म्हटले आहे.