पुणे
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान, अफजलखान यांच्या कुळातीलच असावेत. धरणात मुतणारे आता इतिहासात मुतायला लागेल आहेत. कदाचित तुम्ही पवार नसला, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते, अशा शब्दात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
रविवारी (२२ डिसेंबर) पुण्यात लाल महाल ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा या मार्गावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी देसाई बोलत होते. या मोर्चात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांच्यासह तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले होते.
अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून टीका केली होती. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी मोर्चेही निघाले होते. आज पुण्यातही या आणि धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद अशा विविध मुद्द्यावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.दरम्यान, यावेळी बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, हिंदू धर्माचे रक्षण आपण केले पाहिजे ही भावना आहे.
हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल पण देश आणि धर्माशी तडजोड करणार नाही. आता आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आराध्य दैवत मानतो आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल राजकारण होते हे दुर्दैवी आहे. आपण हे सहन करावे लागलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.आज केंद्रात मोदीजी आहेत, राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. त्यामुळेच आपल्या भावनांची कदर केली जाईल, असं म्हणतं छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू येथे समाधी स्थळ पर्यटन क्षेत्र नाही तर तीर्थक्षेत्र जाहीर करावं अशी मागणी आमदार भोसले यांनी केली.
तसंच जाती, धर्म, पंथ बाजूला ठेऊन एकत्र लढण्याची तयारी केली पाहिजे आणि अशीच एकजूट मागण्या मान्य होईपर्यंत ठेवा, असं आवाहनही शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं.दरम्यान, आजच्या मोर्चामध्ये, “होय मी धर्मवीरच!” “गो हत्या मुक्त पुणे”, “फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर दिन”, “लव जिहाद मुक्त पुणे” असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. तर या मोर्चात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्याही घोषणा देण्यात आल्या.