पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पोंढे येथील खडी क्रशर साठी प्रांत कार्यालयाची दिशाभूल करून मिळविलेली अकृषिक परवानगी अखेर प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी रद्द केली.यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी गायकवाड यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.
अधिक माहिती नुसार, पोंढे तालुका पुरंदर येथील गट नंबर १४२ मध्ये खडीक्रशर साठी अर्जदारांनी प्रांत कार्यालयाकडून अकृषिक परवानगी मिळवली होती.सदर परवानगी मिळविताना नगररचना विभागाचे नियम पायदळी तुडविले होते.याच बरोबर संबंधित १४२ गटातील सह हिस्सेदार व त्या गटालगतच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले गेलेले नव्हते.
संबंधित माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर विलास वाघले,मुरलीधर वाघले,बबन वाघले या सह हिस्सेदारांसोबतच लगतच्या गटातील गजानन लोखंडे,बबन वाघले,रोहिदास वाघले,संपत वाघले,उत्तम कुदळे,सोमनाथ वाघले,अंकुश वाघले व इतर शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल करत न्याय मागितला होता.यावर झालेल्या सुनावणी दरम्यान सर्व बाबींचा विचार करून प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी अर्जदारांनी रेखांकन नकाशावर सह हिस्सेदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत.
सदर गटाचा आजतागायत फाळणीबारा झालेला नाही,तसेच नगररचनाकार बारामती शाखा बारामती यांचा अहवालानुसार व प्रांत कार्यालयाने नमूद केलेल्या अडेशामधील अनेक अटी व शर्तीचा भंग केल्या कारणास्तव सदरची अकृषिक परवानगी रद्द केली.यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांचे विशेष आभार मानले.शेतकऱ्यांच्या बाजूने ॲडवोकेट सौरभ वढणे यांनी कामकाज पाहिले.