अहमदनगर
राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर कालपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राहुरी येथे झालेल्या तुफान पावसात तीन सख्ख्या भावंडांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाजा मृत्यू झाला तर दोन भाऊ जखमीझाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे गुरुवारी रात्री साडेदहा वाजता पाची महादेव वस्तीवर जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतात काढलेला कांदा पावसात भिजू नये म्हणून तो झाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन सख्या भावांच्या अंगावर वीज कोसळली.यात एक जणाचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. भाऊसाहेब रघुनाथ गांधले (वय ४५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर त्यांचे भाऊ भास्कर रघुनाथ गांधले आणि सुनील रघुनाथ गांधले गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार गांधले यांनी नुकताच काढलेला कांदा शेतात ठेवलेला होता. परंतु गुरुवारी रात्री 10 वाजता अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे भाऊसाहेब, भास्कर आणि सुनील हे तिघे भाऊ कांदा झाकण्यासाठी घराबाहेर पडले.
पावसात शेतातील कांदा भिजू नये म्हणून त्यांनी तो झाकूनही ठेवला. परंतु शेतातून परत घराकडे येताना त्यांच्या त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात तिघेही गांधले बंधू जखमी झाले. या घटनेत भाऊसाहेब गांधले यांना बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर शुक्रवारी तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, तनपुरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मृत शेतकरी गांधले यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.