सातारा
क्षुल्लक कारणावरुन माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने मिळून वनरक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यात घडली आहे. हे दोघे पती पत्नी साताऱ्यातील पळसवडे गावचे रहिवासी आहेत.
रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर अशी आरोपींची नावे आहेत. जानकर दाम्पत्याने महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 4 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारहाणीनंतर आरोपी पती पत्नी घटनास्थळावरुन फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करुन आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे.