पुणे
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात पीएमपीएमएल बस चालकाने चक्क सिनेमा पाहत बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चालकाच्या या बेजबाबदारपणाने प्रवाशांच्या जीव मात्र टांगणीला लागला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
या चालकावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पीएमपीएमएल बस चालक आणि वाहक यांच्या बेजबाबदारपणाच्या घटना उघडकीस येत आहे.काही दिवसांपूर्वी बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला होता.
प्रवास करत असताना बसमधील कंडक्टर विश्वनाथ याने पीडितेसोबत अंगलगट केले होते. आता चालकाने चक्क सिनेमा पाहत गाडी चालवल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.सिनेमा पाहत बस चालवत असताना, पीएमपीएमएल बस चालकाचा हा व्हिडीओ बसमधील प्रवाशाने शूट केला आहे. हा प्रकार नेमका कोणत्या मार्गावर घडला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चालकाच्या बेजबाबदारपणाचा व्हिडीओ समोर येताच, नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.