बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणी का सोडलं नाही या कारणावरुन गावगुंडांनी सरपंच महिलेला घरात घुसून मारहाण केली आहे. सोबतच सरपंचांच्या मुलांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी अजूनही पोलिसांना कोणताही गुन्हा नोंद करुन घेतलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावच्या महिला सरपंच रमाबाई जाधव यांना गावातील जवळपास 8 ते 10 जणांनी मारहाण केली.
गावातील नळ का सोडले नाहीत या कारणावरून घरात घुसून जबर मारहाण त्यांना करण्यात आली आहे.यामध्ये महिला सरपंच रमाबाई यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चाकू व गुप्तीने मारहाण झाल्याची तक्रारही त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मात्र यावर जानेफळ पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप सरपंचाच्या मुलांनी केला आहे.दरम्यान जखमी सरपंच रमाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना बुलढाण्यातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या प्रकरणात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी फोन करून गुन्हा दाखल करून तपास करा, असे बजावले असताना देखील गुन्हा दाखल होत नाही.तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेवर जनतेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका महिला सरपंचाला बेदम मारहाण होते त्यात साधा गुन्हा दाखल होत नाही. पोलीस या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आरोपींना पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरु आहे.