सांगली
जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मिरजमधील बेडगावमधील शेततळ्यात दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैुवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत अयाज यूसन सनदी आणि आफान युनूस सनदी या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील नागरगोजे वाडी सनदी वस्ती ठिकाणी दोघेही सख्खे भाऊ शिकत होते. शाळा सुटल्यानंतर दोघेही घरी निघाले होते. त्या दोघांनी घरी जाताना नागरगोजे वाडी सनदी वस्ती याठिकाणी असलेल्या शेत तळ्याजवळ गेले.
या तळ्याशेजारून जाताना लहान भावाचा पाय घसरला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडाले .
दोघे बुडाल्याची वार्ता गावात कळताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी तातडीने रुग्णवाहिका आणली. त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात उपचार करण्याआधीच दोघांचा मृत्यू झाला.अयाज हा १० वर्षांचा होता तर आफान हा ७ वर्षांचा होता. दोघांच्या मृत्यूने सनदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दोन सख्ख्या भावाच्या दुर्दैवी मृत्यूने नागरगोजे वाडी सनदी वस्तीतील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.