औरंगाबाद
सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून शेतकरी मशागतीत व्यस्त आहे. अशातच शेतीची मशागत करत असताना रोटा व्हेटरमध्ये अडकून एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक शिवारात मंगळवारी (२९ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास घडली.सूरज भवार (वय २७) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सूरज भवार यांची बाभुळगाव गंगा शिवारात शेती आहे. सूरज हे सोमवारी रात्री शेतात त्यांच्या रोटा व्हेटरने मशागत करत होते. त्यावेळी अचानक रोटाव्हेटरची सेटिंग बिघडली.
त्यावेळी रोटा व्हेटर ठीक करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक सूरज हे मशीनमध्ये अडकले गेले.
या दुर्देवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सूरज हे शेतात एकटेच असल्याने त्यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान,मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान शेतात रोटाव्हेटर चालू असून एकाच जागेवर उभे असल्याचं परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आलं.त्यावेळी त्यांनी शेतात धाव घेतल्यावर ही घटना उघडकीस आली.
शेतकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती सूरज यांच्या कुटुंबीयांना दिली.या घटनेची माहिती समजताच मंगळवारी पहाटे विरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद रोडगे, प्रविण अभंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत सुरज यांचे मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी विरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.