पुणे
महाविद्यालयात निरोप समारंभावेळी भाषण करत असताना विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी भोवळ येऊन कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
वर्षा खरात (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे आज (दि.५) ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षा खरात परंडा येथील रागे शिंदे महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात शिकत होती. महाविद्यालयीन परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी महाविघालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाषण करताना वर्षा आपल्या महाविद्यालयातील तीन वर्षांतील आठवणींना उजाळा देताना भावूक झाली. त्यानंतर ती भोवळ येऊन कोसळली. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
वर्षाचे आईवडील शेतकरी असून तिच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.