भंडारा
ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी हा प्रकार घडला. सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही.
या प्रकाराची तक्रार पोलिसांसह वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. साकोलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत विरसी येथे सोमवारी ११ वाजता सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती.
या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार चक्क दारू पिऊन आला. तो दारुच्या नशेत इतके तर्र होता की खुर्चीवर बसल्या-बसल्या लोळू लागला.
त्यातच तो बेशुद्ध झाला. ग्रामपंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो उठूही शकत नव्हता.
टुन्न असलेल्या ग्रामसेवकाअभावी पदाधिकाऱ्यांची सभा होऊ शकली नाही. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. आता यांची वरिष्ठाकडे तक्रार झाली आहे.
खंडविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना भेटून घटनेची माहिती दिली गेली आहे. घटनेचे व्हिडीओ आणि फोटो वायरल झाले आहेत.
काही कर्मचारी इमानेइतबारे काम करतात. तर काही जण पाट्या टाकतात. असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यातील विरसीत घडला. ग्रामसेवक ग्रामसभेत आला खरा. पण, तो टुन्न होता.
पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला उठविण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही जागचा हलेना. शेवटी ग्रामसभाच रद्द करावी लागली. या प्रकाराने ग्रामसेवकाची चांगलीच बदनामी झाली.