दररोज संध्याकाळी दोन क्वार्टर दारु आणि चार किलो मटण खाणारा गद्दार आमदार ; माजी शिवसेना जिल्हाप्रमुखांची “या” आमदारावर सडकून टीका

दररोज संध्याकाळी दोन क्वार्टर दारु आणि चार किलो मटण खाणारा गद्दार आमदार ; माजी शिवसेना जिल्हाप्रमुखांची “या” आमदारावर सडकून टीका

सोलापूर

दररोज संध्याकाळी ज्या आमदाराला दोन क्वार्टर दारु लागते आणि चार किलो मटण लागतं, असा आमदार शिवसेनेवर टीका करतो आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर या शब्दांत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी टीका केली आहे. ‘काय झाडी, काय डोंगार’ या डायलॉगमुळे एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीच्या बंडात प्रसिद्ध झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर अभंगराव यांनी आणखीही गंभीर आरोप केले आहेत.

शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली, असा गंभीर आरोपही अभंगराव यांनी केला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर शहाजीबापूंना बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमात शहाजीबापूंची उपस्थिती आणि त्यांचे भाषण हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. शहाजीबापूही भाषणात शिवसेनेवर सडकून टीका करतात. त्यामुळे आतास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीर शहाजीबापूंवरही शिवसेनेकडून टीका करण्यात येते आहे.

शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही साईनाथ अभंगराव यांनी केला आहे. गद्दार आमदार अशी टीका शहाजीबापूंवर करताना, शहाजीबापू यांनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यानंतर बंगला बांधण्यास सुरुवात केली, अशी टीकाही अभंगराव यांनी केली आहे.

त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरांच्या गटात गेल्यानंतर 50 कोटी मिळवले, असा जळजळीत आरोपही अभंगराव यांनी केला आहे.

शहाजीबापू पाटील यांना दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु लागते, 4 किलो मटण लागते, असे सांगत हा आमदार शहाजीबापू पाटील आदित्य ठाकरेंवर कुठल्या तोंडाने टीका करतो, असा सवालही अभंगराव यांनी उपस्थित केला आहे.

आमदारकीसाठी पाय चाटत होतास आणि आता उध्दव ठाकरेंवर टीका करण्याची हिंमत होते आहे, असा टोलाही अभंगराव यांनी शहाजीबापू यांना लगावला आहे. सोलापुरात विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाल्यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी ही जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *