मुंबई
महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जातोय. इथल्या महापुरुषांबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर मुजोरी करतोय, पण महाराष्ट्रातलं सरकार मूग गिळून बसलंय. यामागे लोक म्हणतात तसं नक्की काहीतरी गूढ आहे. त्या अदृश्य हातांना सरकारबद्दल असं काही तरी माहिती आहे, त्यामुळेच सरकार शांत आहे. कोणती तडजोड करून हे सरकार आलंय, हे अदृश्य हातांना माहिती असावं, अशी शक्यता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकारने शिंदे-भाजप सरकारविरोधात काढलेल्या मोर्चात आज खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांवर भाजपा किंवा महाराष्ट्र सरकार कारवाई का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना सुळे यांनी ही मोठी शक्यता व्यक्त केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपची एक संस्कृती होती. यापूर्वीच्या नेत्यांची भाषणं ऐकण्यासारखी असत. प्रमोदजी, सुषमाजी, अरुणजी यांची भाषणं आम्ही आवर्जून ऐकायचो. ते उत्तम वक्ते होते.
ज्या पद्धतीने ते मुद्दे मांडायचे. तेव्हा आपलंही भाषण कधीतरी असावं, असं आमच्या मनात यायचं… पण ज्या पक्षाला एवढी शिस्त होती. त्या पक्षाला काय झालंय माहिती नाही. सुसंस्कृत होता, तसा राहिलेला नाही. सत्ता येते जाते. राज्याची आणि देशाची संस्कृती राहिली पाहिजे. तशी आज राहिलेली नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
केंद्रातील भाजप सरकार राज्यपालांविरोधात कारवाई का करत नाही, याचं उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ यामागे अदृश्य हात आहे. त्यांना महाराष्ट्राला कमी दाखवायचा.
अपमान होताना आनंद मिळतोय. महापुरुषांचा अपमान होतो तरीही सरकार अशा लोकांची पाठराखण करते. सीमाप्रश्नावरही काहीच बोललं जात नाही. गुंतवणूक दुसऱ्या राज्यात गेल्या.
कदाचित हे सरकार तडजोड करून आलंय.
त्या अदृश्य हाताकडे ही माहिती असेल. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची तडजोड त्यांना माहिती असेल. काहीतरी मोठं माहिती आहे का… अशा शक्यता चर्चा समाजात होत असते, ते कदाचित खरही असू शकतं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे .