पुणे
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर धर्मवीर अध्यात्मिक सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले म्हणाले, ‘ अजित पवार, तोंडात येईल ते बोलत राहायचं आणि समाजातील लोकांची माथी भडकवायची हे दिवस आता गेले. अजित पवार हे यापूर्वी देखील आपण एक विधान केलं होतं व आपल्याला त्या विधानामुळे घरी बसावं लागलं होतं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आम्हाला असे वाटले की यावरून आपण बोध घेतला असेल? पुन्हा तीच वेळ येऊ द्यायची नसेल तर आपण ज्या जिल्ह्याचे नेतृत्व करता ती भूमी संतांची व शूरवीरांची आहे किमान बोलताना आपण तारतम्य बाळगल पाहिजे’.
‘शिंदे फडणवीस सरकार समाजापुढे मांडत असणार विकासाचं, आरोग्याचं , शिक्षणाचं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं हिंदुत्व तुमच्या पचनी पडत नाही. आम्हाला हे कोणी शिकवलं असेल, तर ते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पितृचरण महाराष्ट्रात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तोच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत’, असेही पुढे म्हणाले.
‘त्यामुळे अजित पवार यांनी तातडीने माफी मागत आत्मकलेश करत वढू बुद्रुक येथे संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानावर जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,अशी मागणी धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केली.