पुणे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज १८ नोव्हेंबर रोजी झाली. आता २० तारखेला मतदान होईल आणि २३ तारखेला निकाल जाहीर होतील. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण राज्यात जोरदार प्रचार झाला. बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांच्या सभेची चर्चा झाली.
मात्र इकडे कोल्हापूरात शरद पवारांची बहिणी आणि शेकापचे दिवंगत नेते एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी संभाजी भिडेंवर जोरदार हल्ला चढवला.कागल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या प्रचार सभेत बोलताना सरोज पाटील यांनी महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफांसोबत संभाजी भिडेंवर देखील हल्ला चढवला.
सगळ्या जातींमध्ये द्वेष पसरवला जात आहे. तुमची मुले त्या संभाजी भिडेच्या नादाला लागली आहेत का बघा? त्या गटार गंगेत तुमच्या मुलांना जाऊ देऊ नका. भिडे गुरुची आणि टोळकी तुमच्या मुलांना नादाला लावतील पैसे देतील, दारू देतील, जेवण देतील आणि मत देतील. आपली मुले काय करतात ते बघा, अशा शब्दात सरोज पाटील यांनी हल्ला चढवला.
मी काल बारामतीत गेले. अनेक ठिकाणी सभा झाल्या, पण इतकी गर्दी नव्हती. काय भानगड आहे कळत नाही. याचा अर्थ मुश्रीफ नक्की गाडणार तुम्ही असे सांगत सरोज पाटील यांनी मुश्रीफांवर पुन्हा एकदा टीका केली. आमचे वय झाले असले तरी आम्ही बिटिशांच्याविरोधात लढलो आहे.
पण त्यापेक्षा आताचा काळ फार वाईट आहे. आता अतिशय नालायक लोक सत्तेत आली आहेत आणि आमच्यातील काही लोक त्यांच्या नादी लागली आहेत, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांना लगावला.शरद पवारांनी या लोकांना काय काय दिले नाही.
पण पैसा खाल्ला आणि आता ईडीला घाबरून दुसरीकडे गेले. यात अजित पवार हे आमचे रक्त देखील आहे. अजितला शरद पवारांनी मोठे केले. मात्र आमच्या घरातील गडी ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडे गेल्याचे सरोज पाटील म्हणाल्या.