पुणे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चक्क सासवड येथील तडीपार आरोपी बसला असल्याचे आढळून आले. क्लास वन अधिकाऱ्यांच्या रांगेत बसलेला हा बदमाश पाहून पोलिसही काही काळ चक्रावले.
पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक या दोघांच्याही ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याची भर बैठकीतून उचलबांगडी केली. विधान भवनातून त्याची गठडी वळत थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात या आरोपीला हजर करण्यात आले. पोलिसांनी आयपीसी कलम १४२ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केलेली आहे.
प्रदीप बाजीराव जगताप असे या आरोपीचे नाव असून तो सासवड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बैठकीत तडीपार आरोपी बसल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक, क्राईम शाखेचे पोलीस यांच्यासह शहर पोलिस अलर्ट झाले.
तिन्ही विभागांनी आपल्या परीने हालचाली करत आरोपीला बैठकीतून ताब्यात घेतले. प्रदिप जगताप याला प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर खंडणीचे तब्बल ४ गुन्हे दाखल आहेत. याव्यतिरिक्त त्याने तालुक्यात असंख्य उचापती केलेल्या आहेत. पुरंदर हवेली तालुक्यात लोकांना धमकावून व युट्यूब चॅनेलवर बातमी लावून बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा सपाटा त्याने लावला होता.
“अधिकारी उभे, तडीपार खुर्चीत
मोठमोठे क्लास वन अधिकारी या बैठकीला जागा नसल्याने उभेच होते. पण हा तडीपार आरोपी मात्र रुबाबात बैठकीला खुर्चीत बसून जिल्ह्याचं “नियोजन” करत होता. बैठकीत हा आरोपी घुसलाच कसा याबाबत आता चर्चा झडू लागल्या आहेत”.
त्यामुळे त्याच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. जगताप याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा ग्रामीण आदी भागातून तडीपार करण्यात आले आहे.
प्रदिप जगताप हा पुरंदर तालुक्यात ब्लॅकमेलिंग, खंडणीखोरी यासाठी अतिशय बदनाम झालेलं नाव आहे. पुरंदर न्युज या नावाने युट्यूब चॅनल आणि डिजिटल वृत्तपत्र चालवून त्याने गोरख धंदा सुरू केला होता. पैशासाठी तो लोकांना त्रास देत धमकवायचा.
त्याला स्थानिक लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याने त्याने तालुक्यात उच्छाद मांडला होता. मनाला वाटेल ती बातमी आणि मनाला वाटेल त्याची बदनामी असा एकूण कारभार असलेला प्रदिप जगताप तडीपार झाल्याने आधीच पुरंदर तालुक्यात चर्चा रंगल्या होत्या. त्यात आजच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.