माळशिरस पुरंदर
ऑक्सिजन व्हिलेज टेकवडीसाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे.संकल्पना नवीन आहे आणि या गावचे तरुण योग्य दिशेने वाटचाल करीत आहे याचा अभिमान वाटतो,तो उत्साह असाच कायम राहिला तर कंपनी गावच्या विकासात आणखी सहकार्य करेल असे भारत फोर्ज कंपनीच्या सी.एस.आर प्रमुख लिना देशपांडे यांनी सांगितले. टेकवडी(ता, पुरंदर) येथे भारत फोर्ज लि. पुणे व टेकवडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी देशपांडे बोलत होत्या.
भारत फोर्ज लि.पुणे पुरंदर तालुक्यातील विविध गावांत शासनाच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सी.एस.आर फंडातून जलसंधारण व विविध समाज-उपयोगी कामे सातत्याने करत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून टेकवडी गावचे उपसरपंच सूरज गदादे, युवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने साकारत असलेल्या ऑक्सिजन व्हिलेज टेकवडी या नाविन्यपूर्ण संकल्पनेला सहकार्य म्हणून भारत फोर्ज कंपनीच्या वतीने नारळ, बहावा, सप्तपर्णी अशा झाडांचे रोपन मान्यवरांच्या हस्तेकरण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे कंपनीच्या सी.एस.आर प्रमुख लिना देशपांडे,समन्वयक जयदीप लाड,जलसेवक सागर काळे तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे पदाधिकारी, गावचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकरी व ऑक्सिजन व्हिलेजटेकवडी चे शिलेदार उपस्थित होते.