सांगली
एक लाखाची लाच घेताना ताकारी-म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यवसायिक राहुल कणेगावकर यांना रंगेहात पकडलं आहे. दोघांनी टेंडर देण्यासाठी ४ टक्क्यांनी लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. सूर्यकांत नलवडे आणि राहुल कणेगावकर यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सांगलीमधील वारणाली वसाहत मधील अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्ती करिता स्वीपर देण्याच्या टेंडरची ऑर्डर देण्यासाठी चार टक्क्यांनी १ लाखाची लाच घेताना कार्यकारी अभियंत्यासह त्याच्या सहकाऱ्यांस रंगेहात पकडण्यात आलं आहे. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या ऑफिस मध्ये सदरची कारवाई केली.
ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि राहुल कणेगावकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार एका कॉन्ट्रॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
एका खाजगी कंत्राटदाराला वारणाली वसाहत, पाटबंधारे ऑफिस परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरुस्ती करिता स्वीपर पुरविण्याचे टेंडर मिळाले होते. सदरच्या टेंडरची वर्क ऑर्डर देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. यानंतर सदरची कारवाई करण्यात आली.