सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील कोटकामते ग्रा.पं.अपहारामध्ये माजी सरपंच गणेश लक्ष्मण घाडी (52) यांनी सरपंच नसताना चेकवर सह्या करून रक्कम स्वत:कडे ठेवून अपहार केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी त्यांना गुरूवारी अटक केली.
त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोटकामते ग्रा.पं.मध्ये दि. 1 एप्रिल 2019 ते 21 मार्च 2021 या कालावधीत 36 लाख 81 हजार 105 रूपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी पं.स.विस्तार अधिकारी निलेश जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन सरपंच सायली पारकर, ग्रामसेवक दीपक केतकर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होवून अटक झाली होती त्यानंतर त्यांची जामीनावर मुक्तता झाली.
याच गुन्ह्यातील तपासामध्ये कोटकामते गावचे माजी सरपंच गणेश लक्ष्मण घाडी यांनी ग्रा.पं.मध्ये सरपंच पदावर नसताना ग्राम पंचायतीमधील धनादेशावर स्वाक्षरी करून स्वत:चे नावे रोख रक्कम काढून अपहार केला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर घाडी यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुरूवारी त्यांना अटक केली व न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.