पुरंदर
ग्रामपंचायतमध्ये एक सदस्य निवडून आणता येत नाही अशा व्यक्तीने मला खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान मी स्वीकारलं असून फावल्या वेळेत राजकारणात आलेल्या व्यक्तींसोबत खुल्या चर्चा करण्यापेक्षा ज्यांना आम्ही पाच दशकं मतं देत आलोय ते शरद पवार आणि मागच्या १७ वर्षांपासून संसदेत निष्क्रिय बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना खुल्या चर्चेला बोलवा असे आव्हान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना दिले आहे. चांबळी ता. पुरंदर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई झेंडे, उपतालुकाप्रमुख संजय कटके, राजाराम झेंडे, माजी उपसभापती दत्तात्रय काळे, महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक गीतांजली ढोणे, सरपंच प्रतिभा कदम, माजी सरपंच सुनंदा कामठे, शाखाप्रमुख बाबासो कामठे, अशोक कामठे, महेश कामठे, अंकुश कामठे, मोहन शेंडकर, मारुती कामठे, सूरज वाडकर, सोसायटीचे चेअरमन विलास कामठे, महिला आघाडीच्या गण प्रमुख प्रियांका कटके, रुपाली पवार, निता कटके, नवनाथ रावडे, संजय जगदाळे, मेघा राजपुरे, ग्रा.स ज्योती कामठे, मनीषा कामठे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिला आघाडीच्या गीतांजली ढोणे यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवतारे म्हणाले, पुरंदर राष्ट्रवादीच्या नेत्यांना विमानतळ पळवून नेलं तरी काही वाटत नाही. पाणी पळवले तरी हे गप्प असतात. राष्ट्रीय बाजार तालुक्यातून बाहेर नेला तरी यांना सोयरसुतक नसते. मात्र पवारांवर टीका केली की यांचं पित्त खवळतं. त्यामुळे यांचा डीएनए पुरंदरच्या स्वाभिमानी मातीचा आहे का असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे. तालुक्यात आज दिसणारं रस्त्यांचं जाळं, सिमेंट बंधारे, शेततळी, जेजुरी रुग्णालय, धान्य गोदाम, दिवे आरटीओ, क्रीडासंकुल असे अनेक प्रकल्प मागील काळात आम्ही केले. आजच्या नेतृत्वाला तालुक्यात कुठलाही मोठा प्रकल्प आणता आला नाही असेही शिवतारे म्हणाले.