पुणे
लातूर जिल्ह्याच्या उदगीर याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका २ वर्षीय चिमुकल्याचा भयावह अंत झाला आहे. हा चिमुकला आपल्या घरासमोर एका बेंचजवळ खेळत होता.पण अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला. चिमुकल्याचा तडफडून अंत झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
मोहम्मद युसूफ पठाण असं मृत पावलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. तो आपल्या कुटुंबासह लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील अक्कलकोंडा गावात राहत होता. घटनेच्या दिवशी शनिवारी तो आपली पाच वर्षांची बहीण हयात हिच्यासोबत घरासमोर खेळत होता. या घरासमोर ग्रामपंचायतीने बांधलेला एक सिमेंटचा बेंच आहे. या बेंचजवळ खेळत असताना अचानक हा बेंच दोन वर्षांच्या मोहम्मदच्या अंगावर पडला.
सिमेंटचा वजनदार बेंच अंगावर पडल्याने दोन वर्षांचा चिमुकला जागेवरून हलूही शकला नाही आणि ओरडूही शकला नाही. बेंचखाली दबून त्याचा भयावह अंत झाला. या दुर्घटनेत पाच वर्षांची हयात देखील गंभीर जखमी झाली. तिची प्रकृती देखील चिंताजनक आहे. तिच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अक्कलकोंडा ग्रामपंचायतीने गावात अशाप्रकारचे काही सिमेंटचे बेंच बसवले होते. पण या बेंचला काही ठिकाणी नट बोल्ट लावण्यात आले नव्हते. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला, ज्यात एका निष्पाप मुलाचा जीव गेला, तर मुलगी मृत्यूच्या दाढेत अडकली आहे. या घटनेमुळं गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.