पुरंदर
“अभ्यास नसल्याने आमदारांकडून चुका होत असाव्यात, असं मी अगोदर समजायचो. पण, अलिकडे अनेक धक्कादायक बाबी माझ्या लक्षात आल्या आहेत. एका सुनियोजित षडयंत्राद्वारे गुंजवणी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय बाजार असे प्रकल्प कुजवून टाकले जात आहेत. हे पाप करणारा गद्दार दुसरा तिसरा कोणी नसून पुरंदरचा आमदार आहे,’’ अशा शब्दांत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. त्यात त्यांनी आमदार जगताप यांच्यावर विविध मुद्यांवरून निशाणा साधला. फेब्रुवारी-२०२४ पर्यंत विमान उडणार या आमदार जगताप यांच्या दाव्याची खिल्ली उडवताना शिवतारे म्हणाले की, ते कदाचित कागदी विमान उडवणार असतील.
विमानतळात गोंधळ घालून हा प्रकल्प जसा कुजवून टाकला आहे. तसाच प्रकार आता गुंजवणीबाबत चालू आहे. योजनेत दुरुस्ती सुचवली, असं सांगून आणखी दहा-वीस वर्षे वाया घालवायची. गुंजवणीची पाईपलाईन पूर्ण होऊ द्यायची नाही आणि पाणी बारामती-फलटणला जाऊ द्यायचे, अशी गद्दारी केली जात आहे. दिवे येथे नियोजित असलेला राष्ट्रीय बाजार प्रकल्पसुद्धा आता तालुक्यातून बाहेर गेला आहे, असाही आरोप शिवतारे यांनी या वेळी बोलताना केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विजय शिवतारे म्हणाले की, कॉंग्रेस वाईट नाही; पण पुरंदरची कॉंग्रेस ही आमदार जगताप यांची कॉंग्रेस आहे. या निवडणुकांमध्ये तालुक्याच्या हितासाठी जे लोक एकत्र येऊ शकतील, त्या सर्वांना सोबत घेऊन पुढे घेऊन जाऊ.
माजी राज्यमंत्री शिवतारे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या तालुक्याचं हित पाहत असतील, तर ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. परंतु आपले आमदार मात्र गद्दार आहेत. गुंजवणीचा प्रश्न भोरचे आमदार उपस्थित करतात.
विमानतळाचा प्रश्न सातारचे खासदार मांडतात आणि पुरंदरचे आमदार सोसायटीच्या सचिवांचा पगार वाढावा; म्हणून विधानसभेत मागणी करतात. यावरूनच त्यांची लायकी कळते, असा टोलाही शिवतारे यांनी जगतापांना लगावला.